Monday, 19 November 2012

अनंत काशिनाथ भालेराव




अनंत काशिनाथ भालेराव



  अनंतराव भालेराव यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९१९ ला खंडाळा (जि. औरंगाबाद ता. वैजापूर) येथे झाला. त्यांचे वडील काशीनाथराव वारकरी असल्याने  बालपणापासूनच अनंतरावांच्या व्यक्तिमत्वावर वारकरी संप्रदायाचा प्रभाव पडला आणि यामुळे ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या साहित्याचे संस्कारही त्यांच्यावर  झाले.  अनंतराव म्हणजे रापलेला काळा वर्ण, शेतक-याला शोभेल असा राकट देह असे त्यांचे व्यक्तिमत्त्व. अशा राकट देहावर खादीचा मळकट शर्ट धोतर असे त्यांच्या वस्त्राचे स्वरूप . कपडा कोणताही घाला त्याची किंमत उतरून देणारी काही माणसे असतात, अनंतराव त्यांपैकीच एक. आयुष्यातील अनेक चळवळींचा प्रणेता, वैचारिक ग्रंथापासुन ललित वाङमयापर्यंत सगळ्या साहित्याचा चोखंदळ आणि रसिक वाचक होता.
       शिक्षक, राजकीय नेता, साहित्यीक व संपादक असा त्यांचा जिवनप्रवास. याचा अनुभव त्यांच्याशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष काम करणा-यांना आला आहे. समाजातील सर्वच थरातील लोकांशी त्यांचा संबंध होता. नागपूर विद्यापिठातून इंटरची परिक्षा उत्तिर्ण झाल्यानंतर १९३९ साली परभणी जिल्ह्यातील सेलू गावच्या नूतन विद्यालयात मुख्याध्यपकपदी ते रूजु झाले. १९४१ मध्ये सुशीलाबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. १९४४ मध्ये त्यांनी शिक्षकी पेशा सोडून राजकारणात उडी घेतली आणि हैद्राबाद स्टेट काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी पूर्णवेळ कामास प्रारंभ केला. अनंतरावांना सत्तेसाठी राजकारण करण्यात कधीच –हस नव्हता. हे त्यांच्या देहबोलीवरून लक्षात येत होते. नंतर त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. जातीचे पाठबळ नसल्याने ते निवडणुकीच्या राजकारणात टिकु शकले नाहीत. ज्या समाजवादी पक्षाचे ते सदस्य होते तो समाजवादी पक्ष महाराष्ट्रात शहरी, पांढरपेशी म्हणून ओळखला जायचा. पण त्या पक्षालाही अनंतरावांचा वापर विधीमंडळात करावा असे वाटले नाही. यामागचे कारण कदाचित अनंतरावांचे पक्षातील व्यक्तिमत्व. स्वातंत्र्यानंतर त्यांनी विरोधी पक्षाचे राजकारण केले. अनंतरावांनी ज्या काळात राजकारण केले त्याकाळी प्रादेशिक अस्मिता महत्त्वाची मानली जायची.  
      राजकारणातून, समाजकारणातून पुढे ते पत्रकारितेकडे वळाले. त्यातुनच त्यांच्यातील अभिजात साहित्यीक फुलला आणि यातुनच त्यांनी जी पत्रकारिता केली ती छातीठोकपणे. ओघवती भाषा, प्रासादीक लेखणी व ठोस मांडणी यांमुळेच अनंतरावांचे लेख व अग्रलेख दीर्घकाळ स्मरणात राहणारे होते. शैलीदार लिखाणामुळे त्यांच्या लेखांनी त्यांना संपूर्ण महाराष्ट्राचे केले. . कृ. वाघमारे यांनी १९३८ मध्ये सुरु केलेल्या मराठवाडा साप्ताहिकाचे सहसंपादक म्हणून अनंतरावांनी काम पाहिले. हैद्राबाद संस्थानातील स्वातंत्र्यचळवळीला पोषक भूमिका घेतल्याने या पाक्षिकाला संस्थानात छपाई आणि वितरणात अनेक अडचणी आल्या. त्यामुळे त्यासंबंधीची कामे ब्रिटीश अंमलाखालील मुंबईतून अन्य शहरांतून चालवावी लागली.हैद्राबाद संस्थान विलीन झाल्यानंतर साप्ताहिकाचे कार्यालय हैद्राबादला स्थलांतरित झाले. हैदराबादेत सहा वर्षे अनंतराव पत्रकार संघाचे अध्यक्ष होते. प्रांतांच्या भाषावार फेररचनेत मराठवाड्याचा भूभाग महाराष्ट्र राज्यात समाविष्ट झाला. त्यानंतर साप्ताहिकाचे कार्यालय १९५६ मध्ये औरंगाबाद येथे स्थलांतरित करण्यात आले. वाघमारे यांनी एक एप्रिल १९५३ ला मराठवाडाचे संपादकपद अनंतराव भालेराव यांच्याकडे सोपवले. ऑक्टोबर १९६८ पासून मराठवाडा औरंगाबादहून दैनिक स्वरूपात प्रसिद्ध होऊ लागले. पूर्णा, जायकवाडी ही धरणे व्हावीत यासाठी जनमत तयार करण्यात या वर्तमानपत्राने भूमिका बजावली. या दैनिकाने पुरोगामी आणि विकासात्मक पत्रकारिता करतानाच लोकहिताच्या प्रश्नांना सातत्याने मंच उपलब्ध करून दिला. १९७४ मध्ये मराठवाड्याच्या विकासासाठी झालेल्या आंदोलनाला मराठवाडाच्या माध्यमातून अनंतरावांनी सक्रीय पाठिंबा दिला.
      दै.मराठवाडाच्या माध्यमातून अनंतरावांनी सातत्याने समाजहिताची, विकासाची भुमिका घेत त्यांनी लेखन केले. विचारगर्भ व शैलीदार अग्रलेखांद्वारे त्यांनी मराठवाडा दैनिकाला महाराष्ट्रातील प्रमुख वृत्तपत्रांत स्थान मिळवुन दिले. ते हळूहळु जनतेचे व्यासपिठ बनले. स्वातंत्र्योत्तर काळात विकास आंदोलनांत पत्रकार आणि साहित्यीकांची पिढी घडवण्यात अनंतरावांनी महत्त्वाची भुमिका बजावली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अनंतरावांचा सक्रीय सहभाग होता. मराठी जनतेच्या या मागणीसाठी लोकसभेवर धरणे धरण्यासाठी सत्याग्रहींचा जो जथा गेला त्यात अनंतरावांचाही समावेश होता. १९७७ मध्ये आणिबाणिच्या काळात अनंतरावांनी पत्रकार म्हणून महत्वाची भूमिका बजावली. यामुळेच अनंतराव हे मराठवाडा पत्रकारितेतील पितामह म्हणून ओळखले जात. आदर्श पत्रकार हा जनतेचा वकिल असावा लागतो. अनंतरावांनी ही वकिली जन्मभर केली.
    घराण्यातुन चालत आलेल्या वारकरी संप्रादायाचा भालेराव यांच्या विचारांवर मोठा प्रभाव होता ज्ञानेश्वरांच्या विश्वकुटूंब संकल्पनेचा त्यांच्या आचारांवर भारी पगडा होता. संत तुकारामांचा रोखठोकपणा आणि परखड शैलीचे दर्शन त्यांच्या विचारांतुन जाणवत असे. कार्ल मार्क्सांच्या विचारसरणीचे त्यांना आकर्षण होते, तर महात्मा गांधींच्या विचारांवर नितांत श्रध्दा होती. आचार्य विनोबा भावे, लोकनायक जयप्रकाश नारायण, गांधीवादी विचारवंत आण्णासाहेब सहस्त्रबुध्दे, गोविंदभाई श्रॉफ आणि बाबासाहेब परांजपे यांच्याबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आदर आणि भक्ती होती.
    अनंतरावांनी पहिले सत्याग्रही म्हणूनही आपले नाव नोंदवले. नोव्हेंबर १९३८ मध्ये त्यांनी वैजापूर येथे आयुष्यात पहिल्यांदा सत्याग्रहात भाग घेतला. त्याबद्दल त्यांना तीन महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. हैदराबादचा मुक्ती लढा हा भारतीय स्वातंत्र्याला आणि भौगोलिक सलगतेला पूर्णता प्रदान करणारा अखेरचा उग्र लढा होता. उमरी बँकेवरील दरोडयाचे प्रकरण हे हैदराबादच्या लढयातील अतिशय उग्र असे पर्व होते. त्या दरोडयातल्या प्रमुख सूत्रधारांत अनंतराव होते. बँकेवर छापा घालून त्यात मिळविलेली सगळी रक्कम मुक्तीलढयाच्या नेत्यांच्या स्वाधीन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. स्वतःचे प्राण धोक्यात घालून अनंतरावांनी ती जोखीम पूर्ण केली. रानावनातून लपतछपत, उपासमार सहन करीत आणि आपल्या सहकाऱ्यांचे प्राण वाचवीत पार पाडलेल्या त्यांच्या या कामगिरीचे वर्णन हा हैदराबाद आंदोलनातील अतिशय तेजस्वी असा भाग आहे. त्या लढयाच्या काळात अनंतरावांनी खूप प्रसंग अनुभवले आणि खूप माणसे जवळून पाहिली. अखेर १७ सप्टें.१९४८ रोजी भारत सरकारने लष्करी कारवाई करून हैद्राबादला स्वातंत्र्य दिले.
  हैदराबादच्या मुक्तीसंग्रामातला हा लोकप्रिय नेता त्या संग्रामाच्या यशस्वी सांगतेनंतर कधी सत्तेच्या जवळपास फिरकला नाही. मात्र त्यांच्या लढवय्या व्यक्तिमत्त्वातली दाहकता एवढी जबर की तिने सत्तेला कधी स्वस्थही बसू दिले नाही. परिणामी स्वतंत्र भारतातही विचारस्वातंत्र्याच्या आग्रहासाठी त्यांना तुरूंगवास घडतच राहिला. कधी चळवळीपायी तुरूंग तर कधी लेखणीसाठी तुरूंग. होमी तल्यारखान हे महाराष्ट्राचे अन्न पुरवठा मंत्री असताना त्या खात्यातील साखरेच्या गैरव्यवहाराचे अनंतरावांनी जे वाभाडे काढले त्यातून त्यांच्यावर बदनामीचा खटला भरला गेला. तल्यारखानांच्या मागे सरकार तर अनंतरावांच्या मागे सारा मराठवाडा उभा राहिला. अनंतरावांना तुरूंगवासाची शिक्षा झाली. अशाप्रकारे त्यांना कधी लेखणा पायी तर कधी चळवळीपायी तुरूंगवासही भोगावा लागला.
   मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या प्रश्नावर सरळसरळ विरोधाची भूमिका घेतल्यामुळे अनंतरावांना सगळया दलित समाजाचा रोष आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात स्वतःवर ओढवून घ्यावा लागला. त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मराठवाडयाएवढाच महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील वर्गही त्यांच्यावर उखडला होता. अनंतराव समाजवादी प्रवाहासोबत राहिले पण समाजवादी मंडळीच्या इस्लामविषयक भूमिकांबाबत ते नेहमीच साशंक राहिले.आरंभीचे सगळे शिक्षण उर्दूतून झाल्यामुळे इस्लामी वाङमय धर्मग्रंथ यांचा त्यांचा व्यासंग दांडगा होता. त्यांची इस्लामविषयक मते अधिक डोळस होती आणि म्हणूनच त्यांचा एकजात साऱ्या मुसलमानांवर घाऊक रागही नव्हता. उर्दूतील चांगल्या वाङमयकृतींवर ते आवर्जून बोलत इस्लाममधील चांगल्या प्रवृत्तींची मुक्त कंठाने तारीफही करीत. ज्या सामाजिक समतेसाठी लेखणी आणि आयुष्य या दोन्ही गोष्टी पणाला लावल्या त्या समतेचे सैनिकच या काळात त्यांच्यावर तेव्हा चालून जाताना दिसले. अल्पसंख्य दूर, आंबेडकरी संतप्त आणि ज्यांच्याकडे नेतृत्वासाठी पहायचे ती माणसे उपरणी झटकून बाजूला झालेली. अनंतरावांच्या वाटयाला त्या काळात आलेले एकाकीपण असे होते. त्यांच्याविरुध्द उठलेला संतापाचा कहर असा की त्यांच्या भूमिकांमागची कारणे विचारण्याची लक्षात घेण्याची गरज कोणाला वाटली नाही. लोकक्षोभाला विवेक नसतो आणि येथे तर क्षोभाच्या ज्वाळा चोहोबाजूंनी उभ्या झाल्या होत्या. त्यात अनंतरावांचा समाजवाद हरला, दलित-पिडीतांसाठी त्यांनी उपसलेले कष्ट हरवले आणि धर्म जातीनिरपेक्ष मूल्यांसाठी आपल्याच माणसाशी त्यांनी पत्करलेल्या वैराचीही कुणी आठवण ठेवली नाही. त्यातून आलेले एकाकीपण त्यांनी बहिष्कृतासारखे अनुभवले. घराशेजारचे आयुष्यभराचे सोबती-सवंगडीही, मैत्र सोडा पण शेजारधर्मही विसरलेले दिसले आणि पुरोगामीपणाच्या नुसत्याच शाली अंगावर घेतलेली जवळची माणसे शिव्याशाप देताना त्यांना पहावी लागली.
    हैद्राबाद मुक्ती संग्रामातील आठवणींवरील त्यांची पेटलेले दिवस (१९८५) व हैद्राबादचा स्वातंत्र्य संग्राम आणि मराठवाडा(१९८७) ही पुस्तके गाजली.  पळस गेला कोकणात (१९८४) हे प्रवासवर्णन, आलो याचि कारणासी (१९८५) हा अग्रलेखांचा संग्रह, कावड (१९९१) हा संकिर्ण लेखांचा संग्रह, स्वामी रामानंद तीर्थ(१९८९) व मांदियाळी (१९९४) ही चरित्रात्मक पुस्तकेही भालेरावांनी लिहीली. त्यांनी मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीचे सदस्य व मराठवाडा साहित्य परिषदेचे मुखपत्र प्रतिष्ठात च्या संपादक मंडळाचे सभासद म्हणून अनेक वर्षे काम केले. त्यांना इचलकरंजी येथिल फाय फाऊंडेशनचा च्या ११ हजार रूपयांच्या, अत्रे प्रतिष्ठानचा त्याचप्रमाणे दिल्ली येथिल बी.डी.गोयंका(६ लाख)  पुरस्काराने गौरविण्यात आले.
    भालेराव हे वयाने तीर्थरूप पण कर्तूत्वाने तीर्थक्षेत्र आहेत. ते केवळ थोर पत्रकारच नाही तर समाजाला शिवशक्तीचे संवर्धन करणारे फार मोठे आधारस्तंभ आहेत. भालेरावांसारखी माणसे पुरूषार्थाची उपासना करतात, त्यांच्या नजरा हारांसाठी शोध घेत नाहीत. सुगंध देणे हा फुलाचा गुणधर्म, वाहणे हा नदीच धर्म, त्याचप्रकारे निष्काम कर्मयोग हा अनंतरावांसारख्या माणसांचा स्वभाव असतो, असे उद्गार कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी अनंतरावांच्या नागरी सत्काराप्रसंगी काढले होते.
     स्वातंत्र्याच्या आंदोलनापासून विकासाच्या लढयापर्यंत मराठवाडयातील प्रत्येक लढयाचे एक अविभाज्य अंग बनलेल्या अनंतरावांच्या जीवनाचे यशापयश त्या भागातील राजकीय आणि सांस्कृतिक लोकजागरणाच्या निकषावर करावे लागेल. उस्मानशाही अंधारात सगळे जीवन धार्मिक आणि राजकीय गुलामीत काढणाऱ्या या भागातले आजचे राजकीय सामाजिक जागरण हे त्यांच्या, त्यांनी चालविलेल्या दै. 'मराठवाडा'च्या आणि त्यांच्या लढाऊ व्यक्तिमत्त्वाच्या यशाचे निदर्शक असेल. त्यातून अनंतराव संघटनेत रमणारे नव्हते हे लक्षात घेतले तर ते त्यांच्या प्रेरणादायी, एकहाती एकटाकी कर्तृत्वाचेही निदर्शक ठरेल.


महाराष्ट्र आज जो काही घडला आहे, त्यात लोकमान्य टिळक, सुधारक आगरकर, महात्मा जोतिबा फुले यांच्या वृत्तपत्रकार्याचा फार मोठा वाटा आहे. जांभेकर, लोकहितवादी, प्रबोधनकार ठाकरे हे ही वृत्तपत्रकार-लेखक. अनिल बळेल यांनी आपल्या नेहेमीच्या साक्षेपी दृष्टीने महाराष्ट्रातील दहा नामांकित संपादकांची जीवनकार्ये या पुस्तकात फार नेटकेपणाने मांडली आहेत. बळेल यांनी निवडलेल्या दहा संपादकांमध्ये विसाव्या शतकातील लोकमान्य, . चिं. केळकर, आचार्य अत्रे, प्रभाकर पाध्ये, . त्र्यं. माडखोलकर, नानासाहेब परुळेकर, गोविंदराव तळवलकर, माधवराव गडकरी, अनंतराव भालेराव, बापूसाहेब भिशीकर या दहा दैनिकांच्या संपादकांचा समावेश आहे. हे संपादक थोर असले तरी त्यांच्या कर्तृत्वामागे तसेच लेखनामागे प्रचंड मोठे टीमवर्क उभे असते. आणि पुष्कळदा त्या टीममधील शूर वीर अज्ञातच राहतात. आचार्य अत्रे आणि अनंतराव भालेराव हे कोणत्याही गौरवाच्या क्षणी आपल्या अशा सहकार्यांचा आवर्जून उल्लेख करत. या मातब्बर संपादकांच्या यादीत श्री. . माजगावकर, जयंतराव टिळक, द्वा. . कर्णिक, . रा. महाजनी, मुकुंदराव किर्लोस्कर, . वा. बेहेरे, चंदकांत घोरपडे, डॉ. अरुण टिकेकर, कुमार केतकर आदींचाही समावेश होऊ शकतो. खरेतर बळेल यांनी या सार्यांचे श्रेय समाजाला कळण्यासाठी दुसरा खंड जरूर लिहावा.





      




No comments:

Post a Comment