Monday, 19 November 2012

अरब क्रांती







 

अरब क्रांती आणि फेसबुक
सोशल नेटवर्किंगने घङवलेली अरब क्रांती

इजिप्तमध्ये 25 जानेवारी 2011 रोजी रस्त्यावर उतरून लोकांनी जी क्रांती सुरू केली, तिला पहिलं यश मिळण्यासाठी तीन आठवडय़ांत आठशेच्यावर बळी गेले. या अरब स्प्रिंगनंतरच्या इजिप्तची आणि त्या क्रांतीपासून प्रेरणा घेणा-या अन्य देशांची स्थिती आज काय आहे, यावरला हा दृष्टिक्षेप..
इजिप्तमधल्या क्रांतीने सगळ्या जगाच्या अंगावर रोमांच उठवले यात शंका नाही. हुकुमशाही उदध्वस्त होऊन जनतेचा आवाज बुलुंद होतानाचा असा क्षण रोमहर्षकच असतो. त्यातून इजिप्तमधली क्रांती ही रक्तविहीन, नेताविहीन आणि कोणत्याही विचारसरणीचं जोखड खांद्यावर न बाळगणारी. कैरोच्या तहरीर चौकात दिसला तो रसरशीत तरुणाईचा जिवंत आविष्कार. साहजिकच इजिप्तचे अध्यक्ष होस्नी मुबारक यांनी राजीनामा देताच या तरुणांनी केलेल्या स्वातंत्र्याच्या घोषणांनी सारं जग दुमदुमलं. अरब भूमीवरची ही क्रांती जागतिक राजकारणाला कोणतं वळण लावेल याची चर्चा सर्वत्र चालू आहे. पण इजिप्तमधला तरुणांचा हा उठाव समजून घ्यायचा असेल तर वेल घोनिमला जाणून घ्यायला हवं. वेल इजिप्तमधल्या तरुणांच्या या उठावाचा चेहरा बनला आहे. ' फेसबुक फ्रीडम फायटर' असं त्याचं वर्णन जगभर केलं जातंय. जागतिकीकरणाच्या नव्या युगातला हा क्रांतिकारक आहे. इजिप्तमधली क्रांती ही विकीपिडीयाप्रमाणे आहे असं तो म्हणतो. विकीपिडीयात जसे असंख्य लोक माहिती घालू शकतात तसंच या क्रांतीमध्येसुद्धा लाखो अनामिकांनी आपलं योगदान दिलंय असं त्याचं म्हणणं आहे.
 कोण आहे हा वेल घोनिम?
     वेल घोनिम कधीच इजिप्तमधल्या राजकारणाशी संबंधित नव्हता. तो कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही की क्रांतीच्या कोणत्याही तत्त्वज्ञानाने तो प्रभावित झालेला नाही. कैरो मधल्या अमेरिकन विद्यापीठातला हा मॅनेजमेंटचा पदवीधर. तंत्रज्ञान आणि मार्केटिंग हे त्याचे आवडीचे विषय. साहजिकच गुगलमध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करता करता एक दिवस तो या कंपनीच्या आखाती देश आणि आफ्रिकेतल्या ऑपरेशन्सचा प्रमुख झाला.
वेल घोनिमची ही कहाणी प्रातिनिधिक आहे. तहरीर चौकातल्या या संघर्षात कशा प्रकारचे तरुण आघाडीवर होते हे घोनिमच्या कहाणीतून स्पष्ट होतं. या तरुणांनी कोणतंही राजकीय शिक्षण घेतलेलं नव्हतं, कोणत्याही विचारधारेचे जाडजूड ग्रंथ वाचलेले नव्हते. त्यांना हवं होतं फक्त स्वातंत्र्य. स्वातंत्र्याची महती त्यांना मुबारक यांच्या सरकारनेच दिलेल्या अमेरिकन शिक्षणाने पटवली होती. स्वातंत्र्य आणि लोकशाहीमुळे अमेरिकेचा उत्कर्ष होऊ शकतो तर आपला का नाही असा प्रश्न ते विचारत होते. व्यक्तिगत विकास आणि राष्ट्रीय विकास ते वेगळा करून पाहत नव्हते. किंबहुना, व्यक्तीचा विकास झाला तरच राष्ट्राचा विकास होईल आणि त्यासाठी सगळ्या जगाशी जोडून घ्यायला हवं ही शिकवण त्यांना जागतिकीकरणाच्या नव्या वाऱ्याने दिली होती. इजिप्तच्या क्रांतीचं विश्लेषण करताना हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. हे क्रांतिकारक नव्या युगातले, तंत्रज्ञानाची नवी शिकवण मिळालेले, पोथीबद्ध विचार न करणारे क्रांतिकारक आहेत. जागतिकीकरणाच्या काळात घडलेली ही लोकशाही क्रांती आहे.
     अर्थात, इजिप्तची क्रांती ही काही फक्त तरुणांनी केलेली क्रांती नाही. जगातल्या इतर सर्व क्रांत्यांप्रमाणे तरुणांनी त्यात पुढाकार घेतला असेल; पण क्रांतीच्या शेवटच्या टप्प्यात समाजातले सर्व घटक त्यात सामील झाले हे विसरून चालणार नाही. यातला महिलांचा आणि कामगारांचा सहभाग लक्षणीय आहे. इजिप्तमधल्या लोकशाहीवादी संघटना गेली दहा वर्षं देशातल्या दडपशाहीविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करत होत्या. हे सर्व घटक एकत्र आले आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही मोठा पाठिंबा मिळाला म्हणून तहरीर चौकातल्या क्रांतीचं हे रसायन यशस्वी झालं. ही क्रांती फक्त ट्विटर  किवा फेसबुकवरून घडली असा निष्कर्ष काढणंही चुकीचं ठरेल. ट्विटर, फेसबुकसारखी नवी आयुधं तरुणांच्या हातात होती, ती त्यांनी परिणामकारकपणे वापरली. पण इतर सर्व परंपरागत मार्गांचा उपयोगही इथे झाल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे.
     अल् जझीरासारख्या चॅनेलने बजावलेली भूमिका आणि त्यामुळे तहरीर चौकातल्या नागरिकांचा वाढलेला उत्साह विसरून चालणार नाही. माध्यमांचा विकास लोकशाहीच्या आणि लोकआंदोलनाच्या कसा पथ्यावर पडतो हे इजिप्तमधल्या परिवर्तनातून दिसून आलं आहे. ही क्रांती पूर्णपणे यशस्वी होईल की नाही हे आज सांगता येणार नाही. पण आगामी काळातल्या, विशेषत: जागतिकीकरणाच्या युगातल्या अनेक नव्या क्रांत्यांना ती प्रेरणा देईल यात शंका नाही.

अरब देशांत अमेरिकी अर्थानं स्वातंत्र्याचं वारं विसाव्या शतकातच्या उत्तरार्धातच सार्वत्रिक होऊ लागलं. अ स्ट्रेंजर टु हिस्टरी या पुस्तकात भारतीय लेखक आतिष तासीर म्हणतो त्याप्रमाणे, इंग्रजीत विचार करणारी आणि मोकळीक हवी असणारी ही नवी (पहिलीच) मुस्लिम तरुण पिढी हातात मादक पदार्थापासून बंदुकांपर्यंत कशालाही तयार होती! इजिप्तच्या तरुणांनी तरी तासीर यांना खोटं पाडलं. त्यांनी हाती कम्प्युटर घेतला आणि ब्लॉग, यूटय़ूब, ट्विटर आणि फेसबुक वापरून क्रांती घडवून आणली! फेब्रुवारी २०११ मध्ये त्या क्रांतीला पहिलं यश मिळालं : राष्ट्राध्यक्षांना पदच्युत करून, लष्कराच्या हाती सहा महिन्यांसाठी सूत्रं सोपवून सर्वोच्च न्यायालयाला पुढल्या सहा महिन्यांत सार्वत्रिक निवडणूक घेण्याचे अधिकार देण्यात आले. ते सहा महिने आता पूर्ण होत आहेत.
 
अपूर्ण क्रांती हा शिक्का इजिप्त किंवा अन्य कुठल्याही अरब देशातल्या आंदोलनांच्या वाटचालीवर इतक्यात मारता येणार नाही. क्रांत्या वर्षानुवर्ष अपूर्णच राहतात, असा अनुभव आहे. मात्र असा वर्षानुर्वष तगणारा धीर तहरीर स्क्वेअरमध्ये सात महिन्यांपूर्वी जमलेल्या तरुणांना धरता येईल, ही अपेक्षादेखील चुकीची आहे. याचसाठी आपण क्रांती केली होती का? असा प्रश्न करत आता, ट्विटर आणि फेसबुकवरूनच हे तरुण संताप व्यक्त करू लागले आहेत. मुबारक यांची एकाधिकारशाही हटवल्यावर आता लष्करशाहीच येते की काय, अशी भीती काहीजणांना आहे. बाकीच्या शेकडो तरुणांना असं वाटतं की, मुस्लिम ब्रदरहूड संघटना लवकरच राजकीय जबाबदारी निभावेल. सरकार ब्रदरहूडनं बनवल्यास महिलांची स्थिती कशी असेल, याची काळजीयुक्त भीती सध्या महिला संघटनांना आहे.. पण हे सगळेच आवाज दबून जाताहेत. एकतर, ज्या पाश्चात्य मीडियानं तहरीर स्क्वेअरच्या आंदोलन- इव्हेन्टचं लाइव्ह कव्हरेज केलं होतं, तसं आत्ताच्या काळजी.. भीती.. चिंतेचं काहीच व्हिज्युअल त्यांच्याकडे नाही. कार्यकर्त्यांच्या मुलाखती वगैरे अल जझीरा चॅनेलवर दाखवल्या जातात. तब्बल 12 हजार आंदोलक विविध आरोपांखाली लष्करानं तुरुंगात डांबले आहेत. या साऱ्यांवर तुरुंगांतही अत्याचारच होताहेत किंवा सर्वसामान्य आंदोलकांवर लष्करी खटले.. मुबारक आणि त्यांच्या कुटुंबाला मात्र आंतरराष्ट्रीय नियमांप्रमाणे नागरी न्यायालय! हा कुठला न्याय? आणि आम्ही आणखी किती महिने न्यायाची वाट पाहणार? लष्कर शिरजोर होत जाईल.. असं म्हणणारे हे कार्यकर्ते आहेत. नुकतीच दोघा महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची (नेत्यांची) सुटका इजिप्तच्या लष्करी सर्वोच्च न्यायालयानं केली आहे; त्यापैकी अस्मा महफूज्म हिनं ट्विटरवर हल्लीच लिहिलं : ‘‘आता आपण गप्प बसलो तर, लष्कराचा खूनखराबा सुरू होईल.. अनेक जीव जातील.. आयुष्यं बरबाद होत आहेत या लष्करी कोर्टामुळे’’.
 
गंमत अशी की, लष्करानं आपली प्रतिमा सुधारण्यासाठीच अस्मा महफूज यांची सुटका केली आहे. अस्मा या फेसबुकवरून क्रांतीचं आवाहन करणा-या अगदी पहिल्या काही तरुणांपैकी एक. त्यांची सुटका झाली ती त्या ख्यातकीर्त झाल्यामुळे- बाकीच्या अनेकांचं काय, असा ह्यूमन राइट्स वॉचच्या इजिप्त शाखेचा सवाल आहे आणि अस्माही याच्याशी सहमत आहेत. मात्र लष्करानं अस्मा यांची सुटका करताना, अस्मा यांनी जेव्हा बेकायदा कृत्यं केली, त्या वेळी क्रांतीच्या मानसिक प्रभावाखाली असल्यानं त्यांची स्थिती आम्ही समजून घेतो आहोत अशी कबुली देऊन कदाचित आणखीही बरेच कार्यकर्ते याच आधारावर सुटतील, अशी आशा पालवण्याचा मार्ग मोकळा केला आहे. लोक आशावादी नाहीत. उलट, लष्कर बुद्धिभेद करतंय असं ते म्हणू लागले आहेत.
 
सलग सात महिने अविश्वास आणि भीती-काळजीच्या स्थितीत जगणाऱ्या इजिप्शियन जनतेप्रमाणेच टय़ुनिशिया, सिरिया, येमेन, बहारिन या देशांतही अस्वस्थता आहे. टय़ुनिशियात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या पहिल्याच खुल्या निवडणुकीद्वारे त्या देशाची पहिलीवहिली घटना-समिती स्थापन होणार आहे. ९५ टक्के टय़ुनिशियनांनी आम्ही मत देणार असा कौल गेल्या जूनपर्यंत झालेल्या जनमत पाहण्यांमधून दिला होता खरा; पण मतदार याद्या बनवण्याची किचकट प्रक्रिया आता इतकी लांबत चालली आहे की, ऑक्टोबरात निवडणूक घेणं घाईचं ठरेल. सिरियाचे एकाधिकारशहा बशर अल असद यांनी अद्यापही पद सोडलेलं नाही. तिथं लष्करी यंत्रणांमार्फत लोकांचे जीव घेणं चालूच आहे. अशा क्रांति-बळींची संख्या सिरियात दोन हजारांवर पोहोचल्याचा मानवी हक्क संघटनांचा दावा आहे. येमेनमध्ये अली अब्दुल्ला सालेह यांनी मार्चपासून सुरू झालेल्या आंदोलनानंतर स्वत:ची गादी टिकवून बाकी सारी यंत्रणा बरखास्त केली, मग गेल्याच आठवडय़ात १४३ जणांचं नॅशनल कौन्सिल स्थापन झालं. टोळय़ांमध्ये विभागलेले विरोधक मतभेद विसरतील, ही अपेक्षा पहिल्या आठवडय़ात तरी पूर्ण होऊ शकलेली नाही. बहारीनचे हमद बिन ईसा अल-खलिफा हेही राजेपद टिकवण्यासाठी येमेनच्या सालेहप्रमाणेच दंड-भेद नीती वापरताहेत. लिबियात तर इतकी अस्थिरता आहे की, आपण कुणाकडून मारले जाणार, अमेरिकाप्रणीत नाटो फौजांकडून की बंडखोर टोळ्यांकडून, याची चिंता जनसामान्यांना आहे.. वाळवंटात नव्हे- अगदी त्रिपोलीसारख्या राजधानीच्या शहरातही हे युद्धभय कायम आहे.
अरब स्प्रिंग किंवा मध्यपूर्वेतली क्रांती-मालिका सुरू झाल्यावर उत्साहानं स्वागत करणाऱ्या अभ्यासकांचाही सूर आता पालटला आहे. सोशल नेटवर्कमुळे माणसं एकत्र येतील- अगदी रस्त्यावरही उतरतील. पण ही माणसं नेतृत्व देऊ शकत नाहीत. धोरण ठरवू शकत नाहीत. देश चालवण्यासाठी नव्या संस्थांची-यंत्रणांची  बांधणी तर मुळीच करू शकत नाहीत हा वरकरणी प्रतिगामी वाटणारा सूर अरब क्रांती-मालिकेबाबत तरी खरा ठरू लागला आहे.  

फेसबुक, यू ट्यूब किंवा ट्विटरसारख्या माध्यमांमुळे अनेक दशके असलेली आपली राजवट उलथू शकते असा विचार इजिप्त, ट्युनिशिया, सिरिया, येमेन, लिबिया या राष्ट्रांतील राज्यकर्त्यांनी केला नव्हता. तसेच समाजात असलेला राजकीय असंतोषही त्यांच्या नजरेत आला नाही. तो आला असता तर अरब जगतात क्रांतीची लाट पसरत गेली नसती. या सोशल नेटवर्किंगने या राष्ट्रांमध्ये केवळ सत्तापालट केला नाही तर स्वत:हून राजकीय चळवळीचे नेतृत्व पत्करले. लोकांच्या मनातील आकांक्षांना वाट करून दिली. राजकीय व्यवस्थेविरोधात संताप, चीड व्यक्त करण्यासाठी लोकांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ दिले. न्यूजफीड, वॉलपोस्ट, इन्व्हिटेशन्स, ग्रुप्स अशी फेसबुकवरील साधने क्रांतीची नवी आयुधे झाली आणि बघता-बघता ती अरब जगतात लोकप्रिय होत गेली. अरब राष्ट्रांतील जुलमी राजवटींविरोधात लढण्यासाठी शेकडो कम्युनिटीज निर्माण झाल्या आणि जगभरातील विविध राष्ट्रांतील सामान्य माणसानेही अरब जगतातील संघर्षाशी स्वत:ला जोडून घेतले.  ही संघटनशक्ती अतर्क्यच होती. कारण व्हर्च्युअल जगाचा तो नवा आविष्कार होता. प्रत्यक्ष क्रांतीत सहभागी न होताही कोणत्याही जाती-धर्माचा-वंशाचा-राष्ट्राचा नागरिक त्यात स्वत:ला सामील करून घेऊ शकत होता. आपल्या संवेदना तो प्रकट करू शकत होता. जगावर आधिपत्य गाजवणाºया अमेरिका, युरोपीय राष्ट्रांच्या युद्धखोर राजकारणाला जाब विचारण्याचे काम त्याने केले. राजकीय विचारांची, तत्त्वज्ञानाची देवाणघेवाण केली. इतिहासाची उजळणी केली आणि नवा आधुनिक समाज घडवण्याचे प्रयत्न केले.

क्रांती घडवण्यासाठी नेहमी शस्त्रेच हाती घ्यावी लागतात असे नाही तर अहिंसेनेही सत्तांतर होऊ शकते हे माध्यमक्रांतीने सांगितले. त्यामुळेच अरब राष्ट्रांतील जनतेने काही हिंसक घटना वगळता मोर्चे, निदर्शने, संप अशा अहिंसक मार्गाने सरकारी दडपशाहीला प्रत्युत्तर दिले. मानवी समाजावर माध्यमक्रांतीचे आधिपत्य वाढत असल्याचे हे सुचिन्ह आहे. प्रसिद्ध विचारवंत मार्शल मॅक्लुहान यांनी म्हटले आहे की, 1910 ते 1945 या काळात रेडिओ या माध्यमामुळे विविध राष्ट्रांमध्ये राष्ट्रवादाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होऊन माणसा-माणसांत, राष्ट्राराष्ट्रांत वैमनस्य निर्माण झाले होते. हे पाहता माध्यमांचे सामर्थ्य नाकारता येत नाही. शीतयुद्धाच्या काळात आणि नंतर इराक-अमेरिका युद्ध आणि वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यानंतर रेडिओ, टीव्ही, इंटरनेट अशा माध्यमांनी अरब जगताची एकांगी अशी बाजू दाखवली होती. अरब सत्ताधीश, इस्लामी दहशतवाद आणि यादवी यांचेच चित्र ही माध्यमे सातत्याने दाखवत होती. या देशांमधील समाजाच्या एका थरात लोकशाहीसाठी सुरू असलेला सुप्त संघर्ष या माध्यमांच्या नजरेस आला नव्हता. सोशल नेटवर्किंग साइट्सनी अरब राष्ट्रांतील या अंतर्गत संघर्षाला मोकळी वाट करून दिली. हुकूमशहांविरोधातील संताप व्यक्त करण्यासाठी सेफ्टी व्हॉल्व्ह म्हणून काम केले. युवकांच्या अंतरंगात डोकावून बघितले. साधारण विशी-तिशीत असलेल्या युवकापुढे कोणतेही लोकोत्तर नेतृत्व नसताना, कोणतीही आयडॉलॉजी नसताना त्यांचे नेतृत्व स्वीकारले, त्यांचे मार्गदर्शन केले. युवकशक्तीला संघटित केले व आपली समाजाभिमुख जबाबदारी पार पाडली.

        

No comments:

Post a Comment