अण्णा हजारे यांच्या
भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाने देशभर वादळ निर्माण केले. अण्णांना तरुणाईकडून
मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व असा होता. अण्णांना मिळालेला प्रतिसाद
सत्ताधाऱ्यांनाही आपली कार्यपद्धती बदलायला भाग पाडणारा ठरला. अण्णांना आता केवळ
जनलोकपाल विधेयकापुरता हा लढा मर्यादित ठेवून चालणार नाही. अण्णांचे उपोषण ही
भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईची सुरवात आहे. आंदोलनात साऱ्यांना सहभागी करून घ्यावे
लागेल. अण्णांच्या आंदोलनाविषयी व यासंदर्भात घडलेल्या घटनांबाबत माझे मत...
मागच्या २०-२१ वर्षांमध्ये अण्णा हजारेंनी
सहा प्रमुख अशी मोठी आंदोलने केली पण जंतरमतंर वरील अण्णांच्या आंदोलनामुळे
देशभरात एक अभूतपूर्व वादळ उभे राहिलेय, यात
शंका नाही. अण्णांनी त्याला स्वातंत्र्याची दुसरी लढाई म्हटलेय. भ्रष्टाचारामुळे
या देशातील जनतेचा राजकारण्यांवरचा विश्वास संपूर्ण उडालाय. संपूर्ण व्यवस्थाच
बरबटलेली, सडलेली, भ्रष्ट झालेली असताना अण्णांच्या रूपाने
सर्वसामान्यांना एक देवदूतच जणू भेटलेला आहे. त्याचे जनतेला इतके अप्रूप वाटतेय, की अनेकांनी महात्मा गांधींनंतर फक्त अण्णांच, इथवर भाष्य केलेय !
जंतरमंतरच्या या आंदोलनामुळे
अण्णा चार दिवसांत राष्ट्रीय आंदोलनाचे नेते झाले.जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा
मिळाला तो अण्णांच्या नेमक्या आंदोलनाच्या विषयामुळेच. अनेकांना आपल्या
"बेकाबू' आयुष्याचीच
लाज वगैरे वाटू लागली.आता बदल हवाच,ही जाणीव
तीव्र झाली शिवाय प्रसिद्धी मिळवण्यासाठी नाही, तर खरोखरच्या त्राग्यापोटी, संतापापोटी सर्व थरांतील मंडळी रस्त्यावर उतरली.
अण्णांना पाठिंबा जाहीर झाला. भ्रष्टाचाराविरुद्ध संपूर्ण देशाला यानिमित्त
अण्णांची ही टोकाच्या आंदोलनाची भूमिका भावली. त्यात माध्यमांची भूमिका खरेच
मोलाची. जनसामान्यांच्या प्रतिक्रिया, अण्णांच्या
पत्रकार परिषदा, राजकारण्यांचे
प्रतिसाद याचा "आँखो देखा हाल' त्या
सर्व वाहिन्यांनी सतत जनतेपुढे मांडला आणि वातावरण तापते ठेवले. याचा फटका मात्र
सरकारच्या प्रतिमेला बसलाय. अगदी राष्ट्रपती, पंतप्रधान, "यूपीए'प्रमुख
या साऱ्यांना वारंवार बैठका घेऊन भूमिका ठरवायला, बदलायला या आंदोलनाने भाग पाडले.
स्वतः अण्णांना हे निश्चितच
माहिती आहे, की
उपोषण हे एक अस्त्र आहे. सारे मुद्दे मान्य झाले, की विरोधच कशाला करायचा.जयप्रकाश नारायण आणि
बाबा आमटे यांच्या प्रमाणेच तरुण युवा शक्तीला भ्रष्टाचार निर्मूलनाच्या मुद्द्यावर
का होईना, पण
रस्त्यावर उतरून एकत्र करण्याचे श्रेय अण्णांना द्यायलाच हवे. स्वतः अण्णांनी
त्यांच्या आंदोलनाला यशस्वी करण्याचे श्रेय जनतेला आणि माध्यमांना दिलेय; पण माध्यमांमध्ये मात्र अण्णांच्या या
आंदोलनाच्या वृत्तांकनात दोन गट पडल्याचे चित्र या वेळी दिसले. सर्व वार्तांकनात
वृत्तपत्रे आणि टीव्ही वाहिन्यांनी अत्यंत स्पष्टपणे देशातील वाढत्या पाठिंब्याची
वस्तुनिष्ठ नोंद घेतली. पण वाहिन्यांच्या तुलनेने महाराष्ट्रातील काही
वृत्तपत्रांनी मात्र हात आखडता घेतल्याचे स्पष्ट जाणवत होते. स्टार माझा, आयबीएन लोकमत, झी 24 तास अशा सर्व मराठी वृत्तवाहिन्यांनी
लोकांबरोबर राहून उदंड थेट प्रसारणे केली. मराठीच काय, पण टाइम्स नाऊ, झी न्यूज, सीएनआयबीएन
अशा हिंदी-इंग्रजी राष्ट्रीय वाहिन्यांनीसुद्धा जणू कारगील युद्धानंतरचे हे
अंतर्देशीय युद्धच सुरू झाल्याइतपत महत्त्व या आंदोलनाला दिले. पण काही मराठी
वृत्तपत्रांनी आपल्या संपादकियांमधून या अण्णांच्या आंदोलनाबाबत आपली काही
"राखीव' मते
जाहीरपणे मांडली. त्यात अप्रत्यक्षपणे काही वेळा "अण्णा सर्व देशवासीयांचे
एकमुखी नेतृत्व' म्हणून
कसे मानता येतील? लोकांनी
निवडून दिलेल्या सरकारचे काही अधिकारसुद्धा ते का मानत नाहीत? अशा आंदोलनांमुळे सरकारला ते प्रत्येक वेळी
ब्लॅकमेल कसे करू शकतात,' असे
काही प्रश्नार्थक सूरही आळवले जात होते; पण ते
निरर्थक ठरले.
काही प्रादेशिक पक्षांनी
अण्णाच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाला पाठीबां दिला तर काहीनीं अण्णाच्या विरोधी
शेरेबाजी केली. तर काही मंडळीनी तठस्थ राहणेच पसंद केले. राजकीय पुढाऱ्यानी जनतेचा
वाढता रोष व पाठीबां पाहुन या आंदोलनाला तकलादु पाठीबां दिला सुद्धा पण काही काळानंतर
आपला जुना राग आवळत अण्णाच्या या आंदोलनावर चांगलेच तोंड सुख घेऊन स्वतःचे हसे
करुन घेतले. शिवसेनाप्रमुखांनी “वाकड्या
तोडांचा काळा गांधी” असे
म्हणत अण्णाच्या आंदोलनाची खिल्ली उडवली.पण याचा कुठलाही परीणाम या आंदोलकांवर
अथवा उपोषण कर्त्या वर झाला नाही. याउलट गुरुशी तुलना कधीही करु नका मा.गांधीशी
तुलना कदापि नाही असे जाहीर करुन अण्णानीं आपल्या साध्याराहणीचा विचार उपोषण
कर्त्यावर टाकुन आपली अनोखी छाप जपली.
पण अण्णांच्या वैशिष्ट्ये हे की, अण्णांच्या एकनिष्ठतेविषयी, देशप्रेमाविषयी किंवा चारित्र्याविषयी, उद्देशाविषयी आणि बांधिलकीविषयी सर्वानां अप्रुप
होते व ते कधीही एककल्ली, अहंकारी
आणि फक्त स्वतःच्याच विचाराने पुढे जाणारे आहेत. असे कधीही लोकानां वाटले नाही. त्यांना
आंदोलनांसाठी लोक गोळा करावे लागत नाहीत, तर लोक
त्यांच्याकडे खेचले जातात. किरण बेदी, स्वामी
अग्निवेश, बाबा
रामदेव, शांतिभूषण
यांच्यावर समाजाचा विश्वास आहे. त्यामुळे अण्णांच्या आंदोलनांची ताकद, वैचारिक बैठक अधिक विस्तारली माहितीच्या
अधिकाराचे आणि आताचे जनलोकपाल विधेयकाबाबतचे ही अण्णांची दोन आंदोलने विलक्षण
क्रांतिकारक वाटतात. अण्णा हजारे हे मोठे विलक्षण, चलाख, तल्लख
आणि ग्रामीण शहाणपण असलेले, जनसामान्यांची
नस ओळखणारे आणि गांधीवाद प्यायलेले रसायन आहे. ग्रामसभांच्या अधिकाराची त्यांना
पूर्ण कल्पना आहे. नाकर्ते लोकनियुक्त प्रतिनिधी परत बोलावण्याचा कायदा करण्याची
भविष्यकाळातील आंदोलनाची दिशा स्पष्ट करून त्यांनी राज्यकर्त्यांची झोप उडवलीय यात
शंकाच नाही. राळेगणच्या मंदिरात फकिराप्रमाणे राहणाऱ्या अण्णांवरचा लोकांचा विश्वास
किचिंत कमी झाला नाही, हेच
जंतरमंतरच्या नुकत्याच झालेल्या आंदोलनाने सिद्ध केले आहे. आता या आंदोलनामुळे
लोकांच्या मतदान करण्याच्या संख्येत जरी वाढ झाली, तरी फार मोठा फरक पडू शकणार आहे. अण्णांचे हे
आंदोलन सुरू झाले तेव्हा सरकारलाच काय, स्वतः
अण्णांनासुद्धा संपूर्ण देशभरातून त्याला इतका मोठा प्रतिसाद मिळेल याची कल्पना बहुदा
नसावी. विशेषतः तरुणाई, साहित्यिक, कलावंत, सर्वसामान्य
नागरिक ज्या पद्धतीने रस्त्यावर उतरले, त्यावरून
अण्णांचा आंदोलनाचा विषय "भ्रष्टाचार' हा
जनतेच्या मनात किती खोलवर चिड निर्माण करतो हे स्पष्ट होते. अण्णा हजारे या
माणसाला लोकांनी मान दिला आहे.
No comments:
Post a Comment